भारतीय ग्रामीण संस्कृतीदर्शन, ग्रामीण जीवन युद्धाचा आणि नात्यांचा सुंदर गोफ - गल्लीनी भाऊबंदकी

परीक्षण- 1*                    
लेखिका -लतिका चौधरी               
प्रतिक्रिया-कै. प्रा.किसन पाटील,जळगाव -  16 जून 2016

वाङमयीन लेखनात लेखकाची प्रामाणिक आत्मनिष्ठा प्रविष्ट होत असते. त्याच्या आत्मविष्काराचे प्रकटीकरण ,अभिव्यक्ती आत्मकथनात अधिक असते. 'कथन' करण्यात कथनशैली या मौखिक परंपरेचा संदर्भ असतो. परंतु 'कथन' हे मर्यादित स्वरुपात व्यक्त होण्याचा मार्ग म्हणून स्वीकारले तर त्यामध्ये समोर श्रोतृवर्ग अपेक्षित असतो. त्यापेक्षा तोच अनुभव लिहून ठेवताना 'वक्ता' आणि ' (श्रवणकार) हा एका अर्थी लेखकच असतो त्यामुळे कथनापेक्षा लिहिणे खूप अडचणीचे व जिकरीचे होऊन जाते आपणच आपणास व्यक्त करायचे, चूक की बरोबर ,सत्य-असत्य आणि कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचणार नाही अशा भाषेत ते लिहून काढायचे. त्याला त्रिकालाबाधित सत्याचा अंश म्हणून लेखकास भाषाशैलीतून अविष्कृत करायचे असते. यामध्ये लेखक खूप द्रष्टा, अनुभवी आणि मनाच्या सहाव्या इंद्रियाचा पुरेपूर वापर करणारा असावा लागतो.लेखकाचे वाचन संपन्न असले पाहिजे.अनुभवाची शिदोरी भरगच्च हवी. जग आणि निसर्गासह मानवी स्वभावांचे निरीक्षण समृद्ध असावे लागते. त्यातून आपल्या भावविश्वाचे दर्शन तटस्थपणे घडविण्याचे कसब त्याला पाळावेच लागते. म्हणून आत्मकथनपर लेखन हा खूप अवघड असा प्रकार असून त्यामुळे लेखक अवघडून जातो. 'स्व' विषयी बोलणे अथवा तसे लिहिणे कठीण असले तरी एक प्रकारे ती आनंददायी बाब असते. फक्त प्रांजळपणा, वास्तवता, सत्यनिष्ठता यांचा आधार सोडता कामा नये. अतिशयोक्ती आणि 'स्व' स्तुतीची बाधा असता कामा नये,असे म्हटले जाते. याशिवाय अशा आत्मनिवेदनात लालित्य आणि भावनाशीलता असल्याशिवाय ते हृदयस्पर्शी होत नाही. म्हणून आत्मकथनाची मर्यादाच त्यामुळे अधोरेखित होत असते.
 त्यातही बोलीभाषेचा नैसर्गिक गोडवा लाभला तर सदरचे लेखन हे अतिशय संस्मरणीय ठरत असते. मातीचा गंध आणि संस्कृतीचा स्पर्श अशा लेखनाला लाभल्यास त्यातून प्रादेशिक  विशेष अशी         लोकसंस्कृतीची पाळेमुळे उत्कटपणे उमटत जातात.                            
                       खान्देशात ललित गद्य, आत्मकथनपर लेखन तुलनेने खूप कमी लिहिले गेले आहे. आपली 'स्व'ची ओळख आणि त्याचबरोबर परिसराची व सभोवताल समाजाची ओळख जशी झाली तशी मांडण्याचा खूप कमी प्रयत्न झाल्याचे जाणवते. बऱ्याचदा लेखनाचा आत्मविश्वासही कमी पडत असावा. त्यामुळे या प्रपंचात न पडता कविता, कथा, कादंबरीलेखन अनेकांना सोयीचे वाटते. असे असले तरी लिहिण्याची ओढ आणि हौसेखातर लेखन करण्याची उर्मी कमी असत नाही. अशा आनंदी व स्वच्छंदी 'स्व' निष्ठेमुळे लेखकाला लिहावेसे वाटते .याच प्रेरणेतून लतिका चौधरी यांनी लिहिलेल्या आत्मकथनपर आठवणी म्हणजेच अहिराणी बोलीतील 'गल्लीनी भाऊबंदकी' हे पुस्तक होय. त्यांच्या या लेखनाचे स्वागतच केले पाहिजे.                                  
         लतिका चौधरी यांचे कविता,कथा,कादंबरी, ललित अशा अनेक साहित्यप्रकारातून लेखन आहे.
खान्देशी बोलीभाषेतून म्हणजेच अहिराणीतून कविता आणि इतरही लेखन त्यांनी केलेले आहे हे कौतुकास्पद आहे. त्या शिक्षिका असल्यामुळे त्यांनी जे जे अनुभवलं, पाहिलं आणि त्यांना व्यक्त करावेसे वाटले ते विचार,अनुभूती त्यांनी आपल्या या गल्लीतल्या आठवणींच्या रूपाने साकारले आहे. 'गल्ली' हा शब्द इंग्रजीतील  gull(e)y  या शब्दाचे रूप आहे. गल्ली म्हणजे 'ओहोळ'(कोरडा) असला तरी  दुतर्फा घरे बांधलेली आणि मध्यभागी सांडपाणी वाहून नेणारी 'मोरी' (गटार ) कच्ची व्यवस्था असते. खेड्यात अशा मोरीच्या दोन्ही बाजूस घरे असत. त्यामुळे ओहोळाच्या दुतर्फा घरांची रांग म्हणजे गल्ली असा त्याचा बोलीत अर्थ रूढ झाला असावा. उर्दूत यालाच 'मोहल्ला' असेही म्हटले जाते.
 कवी अजिम नवाज राही यांच्या मोहल्ला विषयक कविता प्रचलित आहेत. 'पडझड मोहल्ल्याची' ही त्यांची कविता असो की मोहल्ला ते कबरस्थान ही कविता असो की ' मोहल्ला ते कब्रस्थान' त्यातून व्यक्त होतात भावपूर्ण परंतु  आठवणी!                                    "मोहल्ला ते कब्रस्थानपर्यंत प्रवास म्हणजे आयुष्य. आयुष्याच्या नावावर कसरत तारेवरची. प्रसंग रोज जीवघेणा युद्धाचा" कवीच्या या भावविश्वात संत तुकारामांचा "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग" ही भावावस्था ही जवळची ठरते. यामध्ये भाऊबंदकी असो की गल्लीतील अठरापगड जाती-धर्माचे समाजबांधव असो, त्यांचे साऱ्यांचे भावविश्व आगळे- वेगळे असते. या सर्वांचा . त्यालाच 'आयुष्य म्हटलं तर?'  असे अनेक  प्रश्न उपस्थित होतात. जीवन प्रवासात भेटलेली माणसं, त्यांच्या वृत्ती-प्रवृत्ती, स्वच्छंदीपणा, व सुख- दुःखातील सहभाग, व्यावहारिकता आणि मानसिक भावविश्व असा हा .               
                     आपली अहिराणी बोली, आपला गावगाडा ,त्यातील जीवन वेदना, कष्ट आणि सुख-दुःखे, भाविक नाती आणि त्यातील मायबोलीचे संस्कार, जीवन जगण्याची प्रत्येकाची शैली, बालपणापासूनची जडण-घडण, सण, व्रतवैकल्ये, मुस्लीम बांधवांशी जुळलेला सांस्कृतिक अनुबंध, 'रोजे' करण्याची श्रद्धाशिलता, ऐक्याची भावना,अहिराणी बोलीचा संवादशील वापर ,शेजारधर्माची शिकवण , एकमेकांना दिलेला आधार, समाजातील व्यसनधिनता, कुटुंबाचे उध्वस्त ,  कितीतरी आठवणींना वाट करून देणारं लेखन यातून वाचायला मिळतं. 
                      लतिका चौधरी यांनी बालपणीच्या  भावस्पर्शी आठवणी, कोवळ्या वयातील नाजूक मनातील भावबंध ,खेळणं -बागडणं, बालपणीच्या सुखाच्या काळातील आठवणी अशा पध्दतीने मांडल्या आहेत की  वाचकास आपल्या आठवणी आठवाव्या .आपले बालपण डोळ्यासमोर उभे रहावे.सुंदर,रमणीय बालपण आणि वाढत्या वयाबरोबर आलेली जबाबदारीची जाणीव असा संमिश्र भावनांचा हा आकांत, कल्लोळ तसेच आनंदमय झुरक्यांचा हा भावनिक प्रदेश या लेखनातून साकारतो.
 'लोकसंस्कृती' आणि 'लोकमानस' व रूढी परंपरेचा प्रभाव या लेखनात थेट बोली (अहिराणी )पासून जाणवतो.. गुलाबाई, गौराई ,भालदेव सारखा लोकदेवतांच्या उत्सवाच्या आठवणी,अहिराणी ओव्यातून व्यक्त होणारी स्त्रीमनाची अवस्था आणि गल्लीतील सण उत्सवांचा जल्लोष, लग्नकार्यातील परंपरा आणि सहकार्याची भावना, जीवनातील पिढ्यानपिढ्या जपलेल्या सर्वच लोककलांचा वसा आणि वारसा जतन करण्याची आंतरिक ओढ या लेखनात सर्वत्र जाणवते. म्हणी, वाक्प्रयोग आणि खास अहिराणी ढंगातील शब्दरचना हे या भाषिक प्रयोगाचे वेगळेपण ठरते. अहिराणी बोलीतील या ललीतगद्य , आठवणींमुळे क्षणभर आपणही आपल्या बालपणीच्या भावविश्वात गुरफटत जातो.               
                               संपूर्ण लेखन हे लालित्यपूर्ण शैलीत ,बोलीचा सुंदररित्या वापर, ग्रामीण भागातील लोकजीवन , जीवनशैली, संवाद ,विशिष्ट शब्दशैली ,भगत,डांख्या,घाटा, ग्रामदैवते, जत्रा,यात्रा इ .तसेच कोणत्याही जातीधर्माच्या भेदभाव पलीकडे जात सर्व जातीधर्माच्या रीतिरिवाज ,परंपरा, सण ,उत्सव ,रितिभाती यांचा प्रामाणिकपणे उल्लेख केलाय.
कारण लेखिका स्वतः ते जीवन जगल्या आहेत.ते जगणे त्यांनी स्वतः अनुभवले आहे.त्या त्या समरस झालेल्या असल्याने त्यांना ते जीवन मांडता आले आहे. एवढेच नव्हे तर ग्रामीण लोकसंस्कृतीत नेहमीच्या वापरातील म्हणी, आन्हे ,उखाणे , वाक्प्रचार वापर यामुळे हे लेखन मनाला स्पर्श करते. आधुनिकीकरण , शिक्षणप्रसार  यामुळे अहिराणी भाषा 
मागील काळात मागे पडत असलेली दिसत असली तरी सध्या भाषेबद्दल ओढ,
आदर,सन्मान ,भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्यास सुरुवात झाली हे पाहून
मातीशी जुळलेल्या माणसास आनंद होतो.  त्यात लतिका चौधरी यांनी कविता
,ललीतगद्य हे अहिराणी भाषेत लिहायला सुरुवात केली हे कौतुकास्पद आहे.
साहित्यविश्वात ह्याची दखल घेतली जाईलच ह्यात शंकाच नाही.        
                    खान्देशकन्या लतिका चौधरी यांचे मराठी ,अहिराणी दोन्ही भाषेतून सातत्याने होणारे लेखन ,त्यांची नवनवोन्मेषशालिनी वृत्ती लेखनाच्या विकासाबरोबर वाढताना दिसते. लतिका चौधरी यांच्या प्रांजळ निवेदनपूर्ण हे ललित आजच्या पिढीस आपल्या भारतीय ग्रामीण संस्कृतीचा महत्वपूर्ण दस्तऐवज म्हणून उपयुक्त ठरेल. त्यांच्या लेखनाचे , आठवणींचे मनःपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या पुढच्या विकासशील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.

गल्लीनी भाऊबंदकी
चेतक बुक्स ,पुणे
मूल्य- 265/₹
पुस्तकासाठी  संपर्क- 9326656059

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय - कवी पी पी पाटील

अमयनेर संमेलन नी कहा गोट

आहिराणी शब्दकोषना जनक, आहिराणी मायना सपुत डॉ. रमेश सुर्यवंशी