पायत,मेढ्या आणि मुक्सं =============== ——©MKभामरे.बापु

 


आमच्या मायबोली अहिराणी भाषेतले हे तीन शब्द...

पुर्वीच्या काळी ज्वारी बाजरी मळणीसाठी थ्रेशर वगैरे नव्हते.

बाजरी ज्वारीची कणसे मळणी साठी गावाबाहेर एक सार्वजनिक वा खाजगी पटांगण असायचे.त्याला खळे म्हणत.

उद्या मळणी करायचे असल्यास आज ते शेणामातीने सारवायचे.

दुसर्‍या दिवशी त्यावर कणसे पसरवायचे.

त्या खळ्यात मधोमध एक लाकडी दांडा गाडलेला असायचा.त्याच्या आजुबाजुला कणसे पसरवुन ४/५/६ बैलांची पायत फिरायची.

पायत म्हणजे लाकडी दांड्याला ओळीने बांधलेल्या ४/५/६ बैलांची आडवी रांग.

ती सर्व बैले त्या दांड्याभोवती गोलगोल गरगर फिरायचे.

त्याने कणसे मोकळे होवुन त्यातुन धान्य अलग व्हायचे.

या बैलांमध्ये खुंट्याजवळचा जो बैल असायचा त्याला मेढ्या म्हणायचे.मेढ्या म्हणजे मुख्य.

ह्या मेढ्याला पायी चालनं कमी दिसायचं व ५ व्या ६ व्या बैलाला मात्र मोठा राउंड चालावे लागे.

या बैलांनी कणसं खाऊ नये म्हणुन नारळदोरीने गुंफलेले  मास्क्स तोंडाला बांधलेले असायचे.त्याला मुक्सं म्हणायचे.

यातल्या मेढ्याची अवस्था मोठी बिकट.


पाहणार्‍याला वाटते की त्याला कमी चालावे लागते.

पण त्याला जवळ जवळ स्वतःभोवतीच गोल गोल फिरावे लागते, तेथेच कंबर वाकवुन जागच्या जागी फिरणे त्रासदायक.सरळ होताच येत नाही, मोकळं चालताच येत नाही.

आणि तोंडाला मुक्सं म्हणुन खाताही येत नाही नि तोंड ऊघडताही येत नाही.

खुंट्याला दोरखंडाने बांधले असल्याने सुटका ही नाही,

बाजुला सर्व बैल गुंफलेले असल्याने पळताही येत नाही.

का कुणास ठाऊक मेढ्याची(मुख्याची) ती अवस्था दिसायला सुखद असली,प्रमुख असली तरी त्याचे ते दुःख त्यालाच माहीत,

जबाबदारीच्या खुंटाला कर्तव्याच्या दोरखंडाने बांधलेला व सहनशीलतेच्या , सोशिकतेच्या मुक्शाने तोंड बंद असलेल्या घरातल्या कर्त्य्या मेढ्या सारखी,.

संवेदनशील मनाला बेचैन करणारी !


     —© MKबापु

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय - कवी पी पी पाटील

अमयनेर संमेलन नी कहा गोट

आहिराणी शब्दकोषना जनक, आहिराणी मायना सपुत डॉ. रमेश सुर्यवंशी

भारतीय ग्रामीण संस्कृतीदर्शन, ग्रामीण जीवन युद्धाचा आणि नात्यांचा सुंदर गोफ - गल्लीनी भाऊबंदकी